संशयास्पद मृत्यूचे रूपांतर खुनात; पत्नी व प्रियकरासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
बार्शी (प्रतिनिधी) :
मौजे पुरी (ता. बार्शी) येथे दि. १ मार्च २०२२ रोजी तुकाराम त्रिंबक लुंगसे यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू पोलिसांनी आकस्मिक मानून सि.आर.पी.सी. १७४ अंतर्गत नोंद केली होती. मात्र मयताचा भाऊ नामदेव लुंगसे यांनी हा मृत्यू खुन असून यात मयताची पत्नी व तिच्या प्रियकराने कटकारस्थान रचल्याची तक्रार केली होती.
सदर तक्रारीची पोलीसांनी दखल न घेतल्याने फिर्यादीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. बार्शी येथील जे.एम.एफ.सी. न्यायालयाने (श्रीमती आर.पी. बागडे) फोटो, शवविच्छेदन अहवाल व अन्य पुराव्यांचा आधार घेऊन फिर्यादीच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार सि.आर.पी.सी. १५६(३) अंतर्गत भा.द.वि. कलम ३०२, १२०(ब), २०१ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
त्या आदेशानुसार पांगरी पोलिसांनी दि. २५ जुलै २०२५ रोजी एफआयआर (क्र. १४०/२०२५) नोंदवून आरोपी नरसिंग शिवाजी डीडवळ, जनाबाई तुकाराम लुंगसे, शालन शिवाजी डीडवळ व शिवाजी निवृत्ती डीडवळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. राहुल झालटे यांनी काम पाहिले.