वृत्तपत्रातील बातम्यांवर तात्काळ खुलासा अनिवार्य; शासनाचे परिपत्रक, विलंबास गंभीर दखल
मंत्रालय, मुंबई येथून सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, शासनाच्या योजना, धोरणे, कार्यक्रम तसेच प्रशासन व अधिकारी-कर्मचाऱ्यांविषयी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर संबंधित विभागाने त्याच दिवशी वस्तुनिष्ठ खुलासा देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दि. २२ मार्च २०१६ रोजी निर्गमित या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित विभागाचे सचिव, विभागप्रमुख किंवा कार्यालयप्रमुख यांनी बातमी प्रसिद्ध झालेल्या दिवशीच दुपारपर्यंत संबंधित वृत्तपत्राकडे खुलासा पाठवणे बंधनकारक राहील. या खुलाशामध्ये बातमीतील नकारात्मक बाबींचे तथ्याधारित खंडण असणे आवश्यक आहे.
तसेच, संबंधित प्रकरण मुख्यमंत्री किंवा त्यांच्या विभागाशी निगडीत असल्यास खुलाशाचा मसुदा मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडे तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. इतर प्रकरणांमध्ये सादर केलेल्या खुलाशाची प्रत दुपारी ३ वाजेपर्यंत मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेचे समन्वय व नियंत्रण करण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयावर सोपविण्यात आली असून, दर आठवड्याला याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचेही निर्देश आहेत.
सदर कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करणे संबंधित मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर बंधनकारक असून, नियमांचे पालन न केल्यास गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही शासनाने दिला आहे.