शाळांकडून गणवेश व पुस्तकांसाठी सक्तीला आळा; शिक्षण विभागाचे कडक निर्देश
राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या शाळांवर आता कारवाई होणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना याबाबत स्पष्ट निर्देश देत अशा प्रकारच्या सक्तीवर बंदी घातली आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, कोणत्याही शाळेने पालक किंवा विद्यार्थ्यांवर विशिष्ट दुकान अथवा प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्याचा दबाव टाकू नये. राज्य मंडळ, CBSE आणि ICSE शाळांनी केवळ मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकेच वापरणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेची तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे. या निर्णयामुळे पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदीत स्वातंत्र्य मिळणार असून शाळांकडून होणाऱ्या आर्थिक सक्तीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.