भ्रष्टाचाराविरुद्ध लढा : स्वच्छ राजकारणासाठी जनतेला आवाहन – कामेश घाडी
नवी दिल्ली – “भ्रष्टाचार हा केवळ लाचखोरी नसून तो जनतेचा विश्वासघात, देशाच्या विकासावर घाला आणि लोकशाहीवरचा डाग आहे,” असे मत आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन व रिडबुक फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांनी व्यक्त केले.
निवडणुका जिंकण्यासाठी पैशांचा उधळपट्टी होत असून मंत्री–अधिकारी–ठेकेदार यांच्या संगनमतामुळे सामान्य नागरिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचारामुळे रुग्णालये, शाळा, रस्ते यांचा विकास खुंटतो, करदात्यांचा पैसा चुकीच्या खिशात जातो, न्यायप्राप्ती अवघड होते, योजनांचा खरा फायदा हक्कदारांपर्यंत पोचत नाही आणि प्रामाणिक लोक राजकारणापासून दूर राहतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराच्या प्रमुख कारणांमध्ये निवडणूक खर्चाचा बोजा, कायद्यांची कमकुवत अंमलबजावणी, जनतेचे मौन, शासनातील पारदर्शकतेचा अभाव आणि मतदारांचा मोह हे घटक ठळकपणे जाणवतात, असे घाडी यांनी सांगितले.
यावर उपाय म्हणून नागरिकांनी RTI चा वापर करावा, भ्रष्ट उमेदवारांना नाकारून प्रामाणिक व्यक्तींना निवडावे, तक्रारीसाठी ACB-लोकायुक्तकडे जावे, सोशल मीडियावर पुरावे शेअर करावेत, भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सामील व्हावे आणि लाच देण्यास ठाम नकार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शाळा–महाविद्यालयांत शपथ मोहीम, RTI कार्यशाळा, नाटके, पोस्टर स्पर्धा, सोशल मीडियावरील जनजागृती तसेच ग्रामसभा–आंदोलनांद्वारे भ्रष्टाचाराविरोधी चळवळ उभी करण्याचेही आवाहन घाडी यांनी केले.
“भ्रष्टाचार हा फक्त आर्थिक गुन्हा नाही, तो आपल्या भविष्याचा शत्रू आहे. पुढील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी आजच ठामपणे हाक द्यावी – ‘भ्रष्टाचार चालणार नाही, स्वच्छ राजकारण हवेच, लोकशाही वाचवायची आहे’,” असा निर्धार घाडी यांनी व्यक्त केला.