रखरखत्या उन्हात थंड पाण्याचा दिलासा; डिजिटल मीडिया पत्रकार संघाकडून आंबेडकरांना अनोखी आदरांजली
बार्शी | प्रतिनिधी (दि. १४)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्शी शहरात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. रखरखत्या उन्हात भीम अनुयायांना दिलासा मिळावा यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाटलीबंद थंड पाण्याचे वाटप करत बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. हा उपक्रम शहरात विशेष लक्षवेधी ठरला.
पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. त्याच भावनेतून संघटनेने कडक उन्हाळ्यात समाजहिताचा हा उपक्रम हाती घेतला. या पाणी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले तसेच महायुतीचे नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान, विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी महाआघाडीतील नगरसेवक व नगरसेविकांसह कार्यक्रमस्थळी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी, “चौथ्या स्तंभाने असे समाजोपयोगी उपक्रम अखंडितपणे राबवावेत. पाणी वाटपाचा घेतलेला वसा अविरत सुरू ठेवावा,” असे मत व्यक्त केले.
या उपक्रमाची संकल्पना महिला आघाडी प्रमुख राजश्री गवळी व उपाध्यक्ष शिंदे यांच्या पुढाकारातून सुचल्याचे संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी सांगितले. ग्रामीण अध्यक्ष संतोष कानगुडे यांनी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही सातत्याने राबविले जातील, असे नमूद केले.
या कार्यक्रमास जिल्हा पश्चिम अध्यक्ष विनोद ननवरे, उपाध्यक्ष विजय कोरे, खजिनदार अजय पाटील यांच्यासह गणेश शिंदे, संतोष कानगुडे, अभिजीत शिंदे, निलेश उबाळे, समाधान विधाते, विश्वनाथ सोनवणे व महिला आघाडी प्रमुख राजश्री गवळी उपस्थित होते.
या समाजोपयोगी उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.