कडक उन्हात वीज खंडितीचा फटका; महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

 

राज्यात तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे हाल होत असून उकाड्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

महावितरणकडून होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. वीज व्यवस्थेत ठरलेला ‘मेंटेनन्स डे’ असताना देखभाल कामे त्याच दिवशी करण्याऐवजी इतर वेळी वीज खंडित केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे ऐन गरजेच्या काळात वीज नसल्याने समस्या अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सक्षम घटकांकडे जनरेटर, इन्व्हर्टर किंवा सौरऊर्जा यांसारखे पर्याय उपलब्ध असले तरी सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकडे अशा सुविधा नसल्याने त्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

वीजपुरवठा खंडितीबाबत नियामक नियमांनुसार ग्राहकांना पूर्वसूचना देणे आणि दीर्घकाळ खंडिती झाल्यास भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात व देखभाल कामांचे नियोजन व्यवस्थित राबवावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *