१२ वर्षांच्या संघर्षानंतर आईला न्यायाची किरण; तरुणाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल

१२ वर्षांच्या संघर्षानंतर आईला न्यायाची किरण; तरुणाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल

मुंबई : अपघातानंतर उपचारासाठी दाखल केलेल्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एका आईने तब्बल १२ वर्षे न्यायासाठी दिलेला लढा अखेर फलदायी ठरला आहे. गोवंडीतील २३ वर्षीय सलमान बाबर शाह यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

२०१४ मध्ये झालेल्या दुचाकी अपघातात सलमान यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने गोवंडीतील मिलेनियम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि पुढे दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर १७ एप्रिल २०१४ रोजी सेप्टिसेमियामुळे त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर कागदोपत्री नैसर्गिक मृत्यू नमूद करण्यात आला असला, तरी आई नसीम बानू शाह यांनी सुरुवातीपासूनच वैद्यकीय निष्काळजीपणाचा संशय व्यक्त केला. ऑपरेशनदरम्यान वीज नसताना मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या घटनेनंतर त्यांनी न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पोलिस ठाणे, रुग्णालये तसेच माहिती अधिकाराचा वापर करत त्यांनी कागदपत्रांची मागणी केली. २०१५ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेत त्यांनी प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात संबंधित डॉक्टरांवर निष्काळजीपणा तसेच वैद्यकीय कागदपत्रे न सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

“माझा मुलगा परत येणार नाही, पण दुसऱ्या कुणावर अशी वेळ येऊ नये म्हणून मी लढत राहिले,” अशी भावना नसीम बानू शाह यांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी आणि पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *