बीडमध्ये एसीबीची धडक कारवाई; तहसीलदार ताब्यात, नागरिकांचा जल्लोष

बीडमध्ये एसीबीची धडक कारवाई; तहसीलदार ताब्यात, नागरिकांचा जल्लोष

बीड : राज्याच्या विकासकामांचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातील वातावरणातच लाचखोरीचे प्रकार उघड होत असताना, जिल्ह्यातील महसूल विभागातही गंभीर घटना समोर आली आहे. परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ‘ऐपतीचे प्रमाणपत्र’ देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार समोर आली होती. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे ठरल्याची माहिती आहे.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडे धाव घेतली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. कारवाईची भनक लागताच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नसली, तरी लाच मागितल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, तहसीलदारावरील कारवाईची बातमी समजताच बीडकरांनी चक्क फटाके फोडून जल्लोष केल्याचे चित्र पाहायला मिळाले. महसूल विभागातील कथित गैरप्रकारांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले.

मंत्रालयीन पातळीवरही अन्न व औषध प्रशासन विभागात गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर, मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खात्याचा संदर्भ चर्चेत आहे. अशा घटना उघडकीस येत असल्याने सरकारी यंत्रणेत पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महसूल विभागात या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *