बार्शी बायपासवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू – निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा, वाढत्या अपघातांवर प्रश्नचिन्ह
बार्शी (प्रतिनिधी) : कुडूवाडी–लातूर मार्गावरील बार्शी बायपासवरील उपळाई ठोंगे चौकात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिनी बस चालकाविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीची ओळख विठ्ठल तुकाराम खुणे (वय ५४, रा. आसु, ता. परांडा, जि. धाराशिव) अशी असून, ते आपल्या दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगातील मिनी बसने जोरदार धडक दिली. हा अपघात उपळाई ठोंगे चौक (मौजे लक्ष्याचीवाडी) येथे घडला.
फिर्यादी ज्ञानेश्वर आत्माराम राऊत (रा. आसु) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मिनी बस चालक निशांत दिलीप हिंगणे (रा. मोरोची, ता. माळशिरस) हा वाहन निष्काळजीपणे व वेगात चालवत होता. धडकेमुळे खुणे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, BNS कलम 125 तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २७ मार्च रोजी रात्री ९:५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार करीत आहेत.
दरम्यान, बार्शी तालुक्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे निष्पाप नागरिक बळी जात असून, वाहतूक पोलिस व आरटीओ विभागाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
विशेषतः बायपास मार्गावरील वेग नियंत्रण, सिग्नल व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.