हप्त्यांच्या चर्चेमुळे बार्शीत खळबळ; उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर तक्रार

हप्त्यांच्या चर्चेमुळे बार्शीत खळबळ; उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर तक्रार दाखल

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करणारे एक प्रकरण सध्या बार्शी परिसरात चर्चेत आले आहे. कुर्डूवाडी कार्यालयात पूर्वी कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक (ए.एस.आय.) आनंद जोशी यांच्यावर विनापरवाना दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी दरमहा रक्कम मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बार्शीतील तक्रारदार सतिश नेटके यांनी या संदर्भात सोलापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे लेखी तक्रार सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या तक्रारीनंतरही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस विभागीय चौकशी अथवा प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याची चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे.

तक्रारदाराने दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीस दूरध्वनीवरून विनापरवाना दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी दरमहा ₹२,००० इतकी “मंथली” रक्कम देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. पुढील चर्चेनंतर ही रक्कम ₹१,५०० इतकी निश्चित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच ही रक्कम थेट न स्वीकारता ‘गवळी’ नावाच्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर ‘PhonePe’द्वारे पाठविण्याच्या सूचना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित खात्यावर ₹१,५०० रक्कम पाठविण्यात आल्याचा स्क्रीनशॉट तसेच दूरध्वनीवरील संभाषणाचे कथित रेकॉर्डिंग त्यांच्या कडे उपलब्ध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितली जाणारी “मंथली हप्त्याची मागणी” दर्शविणारी एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची चर्चा आहे. तसेच ‘PhonePe’ व्यवहाराचा स्क्रीनशॉटही काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या ऑडिओ क्लिप अथवा स्क्रीनशॉटच्या सत्यतेबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास हा प्रकार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरू शकतो, असे कायदा तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, बार्शी शहर व तालुक्यात अवैध दारू विक्रीचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरासह तालुक्यातील काही भागांमध्ये विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अवैध विक्रीवर प्रभावी कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

यामुळे बार्शीतील अधिकृत परमिट रूम धारकांमध्येही नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडे लाखो रुपयांची लायसन फी व कर भरूनही अवैध विक्रीवर प्रभावी कारवाई होत नसल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

काही परमिट रूम व्यवसायिकांमध्ये अशी चर्चा आहे की, जर अवैध दारू विक्रीवर नियंत्रण आणले गेले नाही तर येत्या मार्च अखेरपर्यंत काही व्यवसायिक लायसन नूतनीकरण न करण्याचा विचार करू शकतात. असे झाल्यास शासनाच्या अधिकृत महसुलावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणासंदर्भात संबंधित अधिकारी आनंद जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यास ती प्रसिद्ध करण्यात येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *