शिरहट्टीचे भाजप आमदार ५ लाखांची लाच घेताना रंगेहात; लोकायुक्तांची धडक कारवाई
हुबळी/प्रतिनिधी : कर्नाटक मधील शिरहट्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. चंद्रू लमानी यांना लोकायुक्त पोलिसांनी शनिवारी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईदरम्यान आमदारांचे दोन स्वीय सहाय्यक (PA) यांनाही ताब्यात घेण्यात आले असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रकरणाचा तपशील
माहितीनुसार, कंत्राटदार विजय पुजार यांनी लघु सिंचन विभागांतर्गत केलेल्या कामांचे बिल मंजूर करून घेण्यासाठी व तांत्रिक मान्यता (टेक्निकल क्लिअरन्स) मिळवण्यासाठी आमदारांकडून ११ लाख रुपयांची मागणी झाल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केली होती. पडताळणीनंतर लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना आमदारांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, संबंधित कागदपत्रांचीही तपासणी सुरू आहे.
पुढील प्रक्रिया
लोकायुक्त पोलिसांकडून आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात संबंधित विभागातील कागदपत्रे, आर्थिक व्यवहार व इतर बाबींची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. लोकायुक्त विभागाने तपास निष्पक्षपणे पार पाडला जाईल, असे स्पष्ट केले आहे.