बोगस डॉक्टर दाम्पत्याचा जामीन फेटाळला; ‘स्किनरेला’ प्रकरणात न्यायालयाचा कठोर निर्णय

बोगस डॉक्टर दाम्पत्याचा जामीन फेटाळला; ‘स्किनरेला’ प्रकरणात न्यायालयाचा कठोर निर्णय
नाशिक : प्रतिनिधी
वैद्यकीय परवाना व मान्यताप्राप्त पदवी नसताना त्वचारोग तज्ज्ञ असल्याचे भासवून उपचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जयदीप सलील घोषाल व सुजाता जयदीप घोषाल (पिंगे) या दाम्पत्याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. शनिवारी (दि. ३१) न्या. दळवी यांच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने जामीन नाकारला.
सरकारी पक्षातर्फे अॅड. गोरवाडकर यांनी युक्तिवाद केला, तर फिर्यादी व पीडित रुग्ण शुभम गुजर यांनी कोणताही वकील न नेमता स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडली.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास Sarkar Wada Police Station मार्फत सुरू असून कॉलेज रोडवरील ‘स्किनरेला क्लिनिक’ सील करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
विसे मळा परिसरात त्वचारोग तज्ज्ञ असल्याचे सांगून घोषाल दाम्पत्य उपचार करत असल्याची माहिती समोर आली होती. संबंधितांकडे वैद्यकीय पदवी व परवाना नसतानाही रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांत बेकायदा प्लास्टिक सर्जरी केल्याचाही धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
पीडित शुभम गुजर काही महिन्यांपूर्वी चेहऱ्यावरील त्वचारोगाच्या उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेला होता. मात्र कथित चुकीच्या उपचारांमुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर प्रकरणाला वाचा फुटली.
याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार देवकर यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार घोषाल दाम्पत्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
⚖️ प्रकरण न्यायप्रविष्ट असून पुढील तपास सुरू आहे. दोष सिद्ध होणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *