बार्शीत रंगणार ‘श्री भगवंत’ भक्तीचा जागर; प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला विजय थोरात यांच्या भजनाचे अनावरण
बार्शी | प्रतिनिधी
आध्यात्मिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बार्शी शहरात ‘श्री भगवंत’ प्रगट दिनानिमित्त भक्तीमय वातावरणाची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. श्री भगवंत मंदिर समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भगवंत भक्त विजय थोरात (कोरे) यांच्या “माझ्या हृदयात वसतो भगवंत, माझ्या प्रत्येक श्वासात भगवंत” या नव्या भजनाचे अनावरण करण्यात येणार आहे. हा सोहळा २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता श्री भगवंत मंदिर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य डॉ. जयवंत बोधले महाराज यांचे प्रवचन होणार असून, त्यांच्या शुभहस्ते आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत प्रोजेक्टरच्या माध्यमातून भजनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तेजस्विनी कथले राहणार आहेत.
या सोहळ्याला प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यामध्ये तहसीलदार एफ. आर. शेख, मुख्याधिकारी तैमुर मुलानी, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, तसेच माऊली उद्योग समूह चे अमृत नाना राऊत, ज्येष्ठ पत्रकार सचिन वायकुळे यांचा समावेश आहे. याशिवाय डिजिटल मीडिया पत्रकार संघ व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
विजय थोरात यांनी आपली ही भक्तीमय रचना ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून श्री भगवंताच्या चरणी अर्पण केली असल्याचे सांगितले. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या प्रगट दिन उत्सवात यंदा या नव्या भजनामुळे अधिकच रंगत येणार असून, भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
#Barshi #Bhagwant #BhaktiEvent #SpiritualNews #MaharashtraNews