📰 साताऱ्यात दोन राज्यकर निरीक्षकांविरोधात २० हजारांची लाच प्रकरणी गुन्हा
सातारा (दि. ३ ऑक्टोबर २०२५) : साताऱ्यातील जीएसटी कार्यालयातील दोन राज्यकर निरीक्षकांविरोधात २० हजार रुपयांची लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदाराकडून सन २०२१-२२ व २०२२-२३ मधील जीएसटी बाकी तसेच दंड व व्याज माफ करून देण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला ३० हजारांची मागणी केली असता तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
आरोपी
रोहन सतीश देवकर – राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा भवन, सातारा
अक्षय मोहन फडतरे – राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा भवन, सातारा
१९ सप्टेंबर २०२५ रोजी पडताळणीदरम्यान आरोपींनी लाच मागणी केली असल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांनी केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, साताऱ्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, लाच मागणीसंबंधी कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक १०६४ किंवा www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदवावी.