मनरेगा अनुदानासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी निलंबित

 

मनरेगा अनुदानासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण

मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी निलंबित

मुंबई | प्रतिनिधी

मनरेगा योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत चौकशीसाठी आलेल्या शेतकऱ्याशी अर्वाच्य भाषेत वागून बुटाने मारहाण व धमकी दिल्याच्या आरोपावरून मंगरुळपीर (जि. वाशिम) येथील तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांना महाराष्ट्र शासनाने तात्काळ निलंबित केले आहे.

दि. १४ जानेवारी रोजी गोगरी (ता. मंगरुळपीर) येथील शेतकरी ऋषिकेश पवार हे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात गेले असता, संबंधित अधिकाऱ्याने त्यांच्याशी असभ्य भाषेत संवाद साधत मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, लोकमत वृत्तपत्रातही याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती.

प्राथमिक चौकशीत सदर वर्तन शासकीय शिस्त व लोकसेवकांच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे कृषी विभागाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे शासनाने आदेशात नमूद केले आहे.

आयुक्त, कृषी, महाराष्ट्र राज्य यांनी निलंबनाची शिफारस केल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (१)(अ) अन्वये शासनाने हा निर्णय घेतला आहे.

निलंबन कालावधीत संबंधित अधिकाऱ्याचे मुख्यालय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम येथे निश्चित करण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रकरणी पुढील शिस्तभंगविषयक कारवाई स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *