- शासकीय दुखवट्याला केराची टोपली! बार्शी तहसील आवारात वाढदिवसाचा तमाशा
बार्शी | तालुका प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न असताना शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. मात्र या आदेशांनाच पायदळी तुडवत बार्शी तहसील कार्यालयाच्या आवारात वाढदिवस साजरा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रशासनाची संवेदनशून्यता, शिस्तहीनता आणि नियमांबाबतची बेफिकिरी उघड झाली आहे.
दि. २९ जानेवारी २०२६ रोजी बार्शी तहसील कार्यालयातील सब-जेल विभागात महसूल सहाय्यक तथा जेलर संदीप नालपे यांनी शासकीय दुखवटा लागू असतानाही आपला वाढदिवस साजरा केला. कार्यालयात केक कटिंग, सत्कार, फोटोसेशन व आनंदोत्सवाचे प्रकार उघडपणे घडले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले.
शासनाने दुखवट्याच्या काळात कोणतेही समारंभ, कार्यक्रम किंवा आनंदोत्सव साजरे करू नयेत, असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी हा प्रकार घडणे म्हणजे थेट शासकीय आदेशांचे उल्लंघन असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या प्रकरणाबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याने उद्धटपणे उत्तर देत आपल्या कृतीचे समर्थन केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ‘नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का? की सत्ताधाऱ्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांसाठी वेगळे?’ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, तहसीलदार एफ. आर. शेख यांनी या प्रकरणाचे फोटो प्राप्त झाल्याचे मान्य करत संबंधित अधिकाऱ्यास नोटीस बजावून खुलासा मागविण्यात येणार असून, तथ्य आढळल्यास शासकीय नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
शोककाळात शासकीय कार्यालयात केक कापले जात असतील, तर प्रशासनाची शिस्त नेमकी कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.