अतिवृष्टीत सुट्टीचा आदेश धुडकावणाऱ्या सुयश विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

अतिवृष्टीत सुट्टीचा आदेश धुडकावणाऱ्या सुयश विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

बार्शी (प्रतिनिधी) :

सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीदरम्यान जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २३ सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, बार्शीतील सुयश विद्यालयाने हा आदेश न पाळता शाळा सुरू ठेवल्याने गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

 

या संदर्भात पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी बालाजी देवराव नाटके यांनी २४ सप्टेंबर रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार, शाळेच्या मुख्याध्यापकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तहसीलदारांकडून शाळा सुरू असल्याची माहिती मिळताच अधिकारी तात्काळ शाळेत दाखल झाले. दुपारी ४.४५ वाजता विद्यार्थी भरलेली बस शाळेतून बाहेर पडताना दिसली, तर वर्ग रिकामे आणि शिक्षक घरी जाण्याच्या तयारीत होते.

 

या प्रकारामुळे पालक व शिक्षक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलीस तपास सुरू असून, मुख्याध्यापकांना जबाबदार धरून दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *