खोट्या स्वाक्षऱ्यांतून साडेतीन लाखांचा अपहार; सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक अटकेत
टेंभुर्णी : खासगी विना अनुदानित शाळेवर एकही दिवस न आलेल्या शिक्षकाच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर करून खोटे हिशोब तयार केले तसेच बनावट स्वाक्षऱ्या करून सुमारे साडेतीन लाख रुपये हडप केल्याप्रकरणी आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांना टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी केचे यांना अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गैरप्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.