बार्शी तालुक्यात शालेय वाहनांची तपासणी मोहीम सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची तयारी

बार्शी तालुक्यात शालेय वाहनांची तपासणी मोहीम सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची तयारी

बार्शी : प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या शालेय बस व वाहनांमध्ये महाराष्ट्र मोटार वाहन स्कूल बस नियम २०११ चे पालन न केल्याच्या तक्रारींवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) तातडीने तपासणीचे आदेश दिले आहेत. या कारवाईअंतर्गत नियमभंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

बार्शीतील तक्रारदाराने १२ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत अनेक शाळा आणि कंत्राटी वाहनांमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद केले होते. शासनाच्या २२ मार्च २०११ च्या आदेशानुसार स्कूल बससाठी ठरवलेले नियम — वाहनाची स्थिती, बसची क्षमता, चालकाची पात्रता, तसेच सुरक्षा साधने — यांचे काटेकोर पालन आवश्यक आहे.

 

सोलापूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी असिफ मुलाणी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, वायुवेग पथकाला बार्शी तालुक्यातील सर्व शालेय व कंत्राटी वाहनांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान दोष आढळल्यास त्वरित दंडात्मक कारवाईसह अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

या उपक्रमामुळे शाळा व वाहनधारकांना नियमपालनाचे भान येईल तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

“विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या कोणत्याही त्रुटीवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”

— असिफ मुलाणी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *