शाळेत शिक्षक असूनही खासगी क्लासेस घेणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी
नाशिक : जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले अनेक शिक्षक बाहेर खासगी शिकवणी घेत असून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फी वसूल करतात. याविरोधात जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी सांगितले की, काही शिक्षक प्रॅक्टिकल व तोंडी परीक्षेत अधिक गुण देण्याचे आमिष दाखवतात. जे विद्यार्थी खासगी शिकवणीस जात नाहीत त्यांना नापास करण्याच्या धमक्या देण्यात येतात. याविरोधात संबंधित शिक्षकांची नावे समाविष्ट असलेली तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे बुधवारी (दि. २३) सादर केली जाणार आहे.
या संदर्भात शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांना वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पुढील काळातही कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष विवेक भोर, अण्णासाहेब नरुटे, मुकुंद रनाळकर, किशोर सपकाळे, रवींद्र पाटील, विद्या राकडे, प्रतिभा देवरे, कैलास खतानी, वाल्मीक सानप, कैलास देसले, सा. अपसुंदे, विष्णू चव्हाण, पवन जोशी आदी उपस्थित होते.