मोफत उपचाराच्या नावाखाली लाच मागणी; मंगळवेढ्यात खाजगी डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध गुन्हा
सोलापूर (प्रतिनिधी) – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार मिळणे बंधनकारक असतानाही शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंगळवेढा येथील खाजगी डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आरोग्य व्यवस्थेतील गैरप्रकार पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर युनिटने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ नोंदविण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये
डॉ. अरुणकुमार महिंद्रकर (खाजगी डॉक्टर, मंगळवेढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल) आणि सोमनाथ इंगळे (आरोग्य मित्र) यांचा समावेश आहे. त्यांनी तक्रारदाराकडून सुरुवातीला १०,००० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ५,००० रुपये देण्याचे ठरल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले आहे.
तक्रारदाराच्या ७२ वर्षीय आईचा पाय घसरून पडल्याने त्यांना मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तक्रारदाराने शासकीय योजनेतून मोफत उपचार करण्याची विनंती केली. मात्र, संबंधित डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी १६,००० रुपयांची मागणी केली. त्यापैकी ६,००० रुपये घेत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डिस्चार्ज देण्यासाठी उर्वरित १०,००० रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीची पडताळणी २४ मार्च २०२६ रोजी दोन पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त/अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी के’ले आहे.