ई-चलान वसुलीत जबरदस्ती करू नका; वाहनचालकांशी सौजन्याने वागा – परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर पोलिसांना निर्देश

ई-चलान वसुलीत जबरदस्ती करू नका; वाहनचालकांशी सौजन्याने वागा – परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर पोलिसांना निर्देश

मुंबई : राज्यातील वाहतूकदार संघटनांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित ई-चलान दंड वसुली करताना वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, तसेच चालकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करावे, असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ स्तरावरून सर्व वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत विविध वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी काही तक्रारी मांडल्या होत्या. त्यामध्ये वाहतूक पोलीस रस्त्यावर वाहनांना थांबवून प्रलंबित ई-चलानचा दंड जबरदस्तीने भरायला लावतात, वाहन दीर्घकाळ थांबवून ठेवतात, कागदपत्रे किंवा वाहन जप्त करण्याची धमकी देतात तसेच चालकांशी उध्दटपणे वागतात, अशा बाबी उपस्थित करण्यात आल्या.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच महामार्ग पोलीस यांना सूचना देणारे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार प्रलंबित ई-चलानची रक्कम वाहनचालक स्वेच्छेने भरण्यास तयार असल्यासच ती स्वीकारावी, तसेच वाहन जप्तीची कारवाई न्यायालयाच्या आदेशाशिवाय करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी चालकांशी सभ्यतेने वागावे आणि कोणत्याही प्रकारची अवैध मागणी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *