ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी पोलिसांवर कारवाई; दोन वाहतूक कर्मचारी निलंबित, चालकाची पुढील कारवाईची मागणी
सोलापूर : पंढरपूर शहरात ट्रक चालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित दोन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
३ मार्च २०२६ रोजी पंढरपूर शहरातील मंगळवेढा नाका येथे वाहतूक कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी एका ट्रक चालकाला मारहाण केल्याची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा मुद्दा राज्याच्या विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता.
घटनेची चौकशी केल्यानंतर संबंधित दोन पोलिस अंमलदारांनी कर्तव्यावर असताना बेशिस्त वर्तन केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. त्यानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असली तरी संबंधित ट्रक चालकाने मारहाण करणाऱ्या पोलिसांवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर पुढील कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
या प्रकरणामुळे पंढरपूर शहरात पोलिसांच्या वर्तणुकीबाबत चर्चा रंगू लागली असून, प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.