सवलतधारकांसाठी एसटीचे ‘NCMC’ स्मार्ट कार्ड; राज्यभर नोंदणीला सुरुवात

सवलतधारकांसाठी एसटीचे ‘NCMC’ स्मार्ट कार्ड; राज्यभर नोंदणीला सुरुवात

मुंबई (दि. २३ फेब्रुवारी २०२६) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली असून सवलतधारक प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. रोखविरहित, पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ही प्रणाली लागू करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाच्या जनसंपर्क शाखेने दिली.

राज्यातील प्रत्येक आगार व विभागीय कार्यालयात सवलतधारकांनी आवश्यक कागदपत्रे व निर्धारित शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्ड घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार साध्य होणार आहेत. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महामंडळाने Ebix Technologies Ltd आणि NSDL Payments Bank यांच्याशी करार केला आहे.

कोणाला मिळणार NCMC कार्ड?

या योजनेत विविध सवलतधारक घटकांचा समावेश करण्यात आला आहे—

विद्यार्थी : शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी संलग्न कार्ड.

ज्येष्ठ नागरिक व महिला : अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आधार संलग्न कार्ड.

दिव्यांग प्रवासी : UDID क्रमांकाशी जोडलेले विशेष सुविधा असलेले कार्ड.

पुरस्कारार्थी व पत्रकार : स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना मुख्यालय, विभागीय कार्यालय व आगारामार्फत वितरण.

कार्डची वैशिष्ट्ये

किंमत : नवीन कार्ड १९९ रुपये (जीएसटीसह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.

वॉलेट मर्यादा : किमान १०० रुपये; ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.

रिचार्ज सुविधा : ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप किंवा नियुक्त एजंटमार्फत रिचार्जची सोय.

सवलतधारक प्रवाशांनी लवकरात लवकर नोंदणी करून या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *