दूधात युरिया, आइस्क्रीममध्ये डिटर्जंट; अन्न भेसळ म्हणजे थेट जनतेच्या जीवाशी खेळ – राज्यसभेत राघव चड्ढांचा सरकारवर घणाघात

 

दूधात युरिया, आइस्क्रीममध्ये डिटर्जंट; अन्न भेसळ म्हणजे थेट जनतेच्या जीवाशी खेळ – राज्यसभेत राघव चड्ढांचा सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : प्रतिनिधी

देशात खाण्याच्या ताटात विष पोहोचत असतानाही सरकार आणि यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत केला. दूधात युरिया, आइस्क्रीममध्ये डिटर्जंट, मसाले आणि मिठाईत घातक रसायने मिसळून सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले जात असल्याचे गंभीर वास्तव त्यांनी सभागृहात उघड केले.

“ही केवळ भेसळ नाही, तर करोडो नागरिकांच्या आरोग्यावर चाललेला उघड हल्ला आहे. सरकारची निष्क्रियता म्हणजे या गुन्ह्यांना मूक संमती आहे,” असे परखड शब्दांत चड्ढा यांनी सुनावले. अन्न भेसळीमुळे कर्करोग, किडनी विकार, लहान मुलांमध्ये आजार वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

FSSAIसारखी यंत्रणा कागदावर आहे; प्रत्यक्षात बाजारात डिटर्जंट, युरिया, रासायनिक रंग खुलेआम विकले जात असल्याने अन्न सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचा आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर चड्ढा यांनी सरकारला तीन कडक सूचना दिल्या —

भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारावासाची तरतूद करा, अन्न तपासणी प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात सक्तीने उभारा आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी, उत्तरदायी यंत्रणा उभी करा.

“जनतेला स्वच्छ पाणी आणि शुद्ध अन्न देणे हे उपकार नाहीत, तर सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे,” असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *