महत्त्वाची बातमी : फेसबुक-एक्सवरील पोस्ट सरकारी कर्मचाऱ्यांना महागात पडणार; सोशल मीडिया वापरावर राज्य सरकारचे कडक निर्बंध
मुंबई | प्रतिनिधी
फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सोशल मीडियावर पोस्ट, रील्स किंवा वैयक्तिक मतप्रदर्शन केल्यास आता संबंधितांवर थेट कारवाई होणार असून, राज्य सरकारने सोशल मीडिया वापरावर कडक निर्बंध लागू केले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने न्यायिक अधिकारी आचारसंहिता नियम २०२६ यास मंजुरी दिली असून, त्यानुसार सोशल मीडिया कंटेंट तयार करणारे किंवा त्यावर सक्रिय असलेले सरकारी कर्मचारी व अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरणार आहेत. शासकीय पद, अधिकार, कामकाज, प्रलंबित प्रकरणे, राजकीय विषय किंवा वादग्रस्त बाबींवर पोस्ट करणे, प्रतिक्रिया देणे अथवा शेअर करणे यावर स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे.
या धोरणानुसार, सरकारी कर्मचारी सोशल मीडियावर सरकारची प्रतिमा मलीन करणारा, गोपनीय माहिती उघड करणारा किंवा आचारसंहितेला बाधा आणणारा मजकूर प्रसारित करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर चौकशी, वेतनवाढ रोखणे, पदावनती, निलंबन अथवा अन्य कठोर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
शासन प्रशासनातील शिस्त, तटस्थता व विश्वासार्हता अबाधित राहावी, यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.