महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापना २४ तास सुरु ठेवण्यास मंजुरी – शासन परिपत्रक जारी
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने नवे परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, खाद्यगृहे, हॉटेल्स, मॉल्स व आस्थापना २४ तास सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयातून मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना, परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक यांना वगळण्यात आले आहे.
१ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मधील कलम १६ (१) (ख) अन्वये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस सुरु ठेवता येतील. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून सलग २४ तासांची विश्रांती देणे बंधनकारक राहील.
२०१७ मधील अधिसूचनेनुसार राज्यातील मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या सुरु व बंद करण्याच्या वेळा शासनाने निश्चित केलेल्या असल्यामुळे, या आस्थापना मात्र २४ तास सुरु ठेवता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशानंतर राज्यातील दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स व इतर आस्थापना २४ तास सुरु ठेवण्यास अडथळा येणार नाही, असे शासनाने नमूद केले आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला असून तो डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध करण्यात आला आहे.