कायदा-सुव्यवस्थेचा कणा; पोलिस निरीक्षकाची पोलीस ठाण्यातील कायदेशीर व प्रशासकीय कर्तव्ये
भारतीय न्याय संहिता व पोलीस कायद्यानुसार जबाबदाऱ्या निश्चित
प्रतिनिधी | महाराष्ट्र
पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीत पोलिस निरीक्षक (Police Inspector) हे प्रमुख व जबाबदार अधिकारी असून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्ह्यांचे प्रतिबंध व तपास करणे, तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ व कायदेशीर कारवाई करणे ही त्यांची मूलभूत जबाबदारी आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत पोलिस निरीक्षकाची कर्तव्ये स्पष्टपणे निश्चित करण्यात आली आहेत.
कायदेशीर व प्रशासकीय कर्तव्ये
पोलिस निरीक्षकाचे प्रमुख कर्तव्य म्हणजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखणे. दखलपात्र गुन्ह्यांची तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंदविणे (FIR), तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती करून निष्पक्ष व वेळेत तपास पूर्ण करणे ही जबाबदारी त्यांच्यावर असते.
तसेच कायदा भंग, दंगल, मोर्चे, आंदोलने, सार्वजनिक कार्यक्रम, निवडणूक प्रक्रिया आदी प्रसंगी बंदोबस्त आखणे व प्रभावी अंमलबजावणी करणे, संशयितांवर नजर ठेवणे, प्रतिबंधात्मक कारवाई (CRPC/BNSS अंतर्गत) करणे, अवैध शस्त्रसाठा, जुगार, दारू, अंमली पदार्थ आदी बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करणे हेही पोलिस निरीक्षकाचे कर्तव्य आहे.
नागरिकांप्रती जबाबदारी
नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यांना न्याय देण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन करणे, महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, मानवाधिकारांचे संरक्षण करणे व पोलिस यंत्रणेवर जनतेचा विश्वास दृढ करणे, ही जबाबदारीही पोलिस निरीक्षकावर असते.
अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण
पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांचे कामकाज नियोजन, शिस्तपालन, प्रशिक्षण, तपासाची गुणवत्ता, नोंदींचे संधारण व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करणे, यासाठी पोलिस निरीक्षक जबाबदार असतो.
कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवताना निष्पक्षता, पारदर्शकता व कायद्याचे काटेकोर पालन करणे हेच पोलिस निरीक्षकाच्या कर्तव्यांचे केंद्रबिंदू असून, त्यावरच पोलीस प्रशासनाची विश्वासार्हता अवलंबून असते.