महामार्गांवर अतिक्रमण ठरतेय मृत्यूचा सापळा

 

महामार्गांवर अतिक्रमण ठरतेय मृत्यूचा सापळा!

केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश; ‘रस्ते व्यापारासाठी नव्हे, प्रवासासाठी’

नवी दिल्ली | प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गांवर वाढत चाललेले अतिक्रमण हे थेट नागरिकांच्या जीवावर बेतत असून, अपघातांचे प्रमाण वाढविणारे गंभीर कारण ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग हे व्यापार, फेरीवाले किंवा अनधिकृत बांधकामासाठी नसून सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठीच आहेत, असा ठाम इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिला आहे.

महामार्गांवर दुकाने, हातगाड्या, साहित्याचा साठा, अनधिकृत पार्किंग यामुळे वाहनचालकांची दृष्टी अडथळित होत असून, क्षणार्धात जीवघेणे अपघात घडत आहेत. अनेक वेळा रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांनाही मार्ग मिळत नसल्याचे वास्तव मंत्रालयाने अधोरेखित केले आहे.

या पार्श्वभूमीवर देशभरातील संबंधित यंत्रणांना महामार्ग मोकळे व सुरक्षित ठेवण्यासाठी अतिक्रमण हटविण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

नागरिकांनी कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले असून,

“सुरक्षित रस्ते – सुरक्षित प्रवास” हाच केंद्र सरकारचा स्पष्ट संदेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *