तुळजापूर लाच प्रकरणाला नवे वळण; एएसआय आरदवाड अटकेनंतर प्रभारी निरीक्षक मांजरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
धाराशिव:
तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) श्रीनिवास आरदवाड यांच्यावरील कारवाईनंतर या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात तुळजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या भूमिकेबाबतही विविध चर्चा सुरू झाल्या असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय आरदवाड आणि प्रभारी निरीक्षक मांजरे हे यापूर्वी धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात एकत्र कार्यरत होते. त्यामुळे या दोघांमध्ये जुने संबंध असल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एका पदावरून कामतकर यांची अचानक बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी एएसआय श्रीनिवास आरदवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती ‘क्रीम पोस्टिंग’ मानली जात असल्याने या बदल्यामागील कारणांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरदवाड यांनी घेतलेली रक्कम केवळ त्यांच्यासाठी होती की या प्रकरणात इतर कुणाचा सहभाग होता, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रभारी निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची भूमिका काय होती, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.
दरम्यान, एखाद्या पोलीस ठाण्यात लाचखोरीचा प्रकार घडल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्यावरही कारवाई होऊ शकते, असे वरिष्ठ स्तरावरून पूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात आणि वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे