रस्त्यांवरील खड्ड्यांवरून हायकोर्टाचा संताप : गुत्तेदार-पालिका अधिकारी जबाबदार
मुंबई | प्रतिनिधी
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यात १२ जणांचा मृत्यू आणि ११ जण जखमी झाल्याची गंभीर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. “एका आठवड्यात खड्डे बुजवून दोषी गुत्तेदारांवर कारवाई करा,” असा तोंडी आदेश खंडपीठाने राज्यातील सर्व पालिकांना दिला.
मुंबईत काही रस्ते अनेक वर्षे चांगल्या स्थितीत राहतात, मग काही रस्ते दरवर्षी उखडतात कसे? असा सवाल न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला केला. आतापर्यंत किती गुत्तेदारांवर कारवाई झाली, अशी विचारणा न्यायालयाने केली.
नागरिकांचे जीव खराब रस्त्यांमुळे जात आहेत, त्यामुळे संबंधित गुत्तेदार व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी यांना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यासोबतच पीडितांना योग्य भरपाई मिळायलाच हवी, असे स्पष्ट करत “भरपाईची रक्कम अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल केली तरच गंभीरता येईल,” अशी कठोर तंबीही खंडपीठाने दिली.