खाजगी रुग्णालयांची नफेखोरी, शासकीय रुग्णालयांचा अनुभव अमूल्य

खाजगी रुग्णालयांची नफेखोरी, शासकीय रुग्णालयांचा अनुभव अमूल्य

 

मुंबई | प्रतिनिधी

 

“खाजगी रुग्णालयात उपचार उत्तम मिळतात, तर शासकीय रुग्णालये निकृष्ट असतात” असा समज समाजात प्रस्थापित करण्यात आला आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी असल्याचे आरोग्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

बहुतेक खासगी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असतो. कारण भांडवलाची कमतरता. वीस-तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर्स मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालयांत कार्यरत असतात. त्यांना व्यवसायिक टार्गेट्सची सक्ती नसल्यामुळे ते प्रामाणिकपणे आणि रुग्णहिताचे उपचार करतात. अनावश्यक तपासण्या, शस्त्रक्रिया किंवा खर्चीक उपचारांची सक्ती केली जात नाही.

 

रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान करण्यात शासकीय डॉक्टर तरबेज असतात. याच अनुभवाच्या जोरावर उपचार यशस्वी होतात. खर्च कमी असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर आर्थिक ताण पडत नाही. उलट खाजगी रुग्णालयांतील महागड्या बिलांमुळे रुग्णदबाव वाढतो. कोविड काळात झालेल्या DAMA (Discharge Against Medical Advice) प्रकरणांमध्ये अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत.

 

शासकीय रुग्णालयांविषयी स्वच्छतेबाबत नेहमी तक्रारी होतात. परंतु त्यामागे कारण म्हणजे प्रचंड रुग्णसंख्या. एका बाजूला शंभर फोर्टिस रुग्णालयांची मिळून जी गर्दी होते, त्याहून अधिक गर्दी केईएमसारख्या एका शासकीय रुग्णालयात असते. तरीदेखील डॉक्टरांचा सकाळ-संध्याकाळ राऊंड होत असतो. तज्ज्ञ डॉक्टर नियमित भेट देतात.

 

याउलट खासगी रुग्णालयांत डॉक्टरांचा अभाव जाणवतो. कल्याण येथील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात तीन महिन्यांपर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवलेला जीबीएस रुग्ण योग्य ‘ऑक्सिजन ट्रायल्स’शिवाय ठेवण्यात आल्याची घटना आरोग्य कार्यकर्त्यांनी उघड केली आहे. तर शासकीय रुग्णालयांत अशा रुग्णांना वेळेत व्हेंटिलेटरवरून मुक्त करून संसर्गाचा धोका टाळला जातो.

 

शासकीय रुग्णालयांनी अनेकदा रुग्णांना दोन-तीन वर्षे ॲडमिट ठेवून संपूर्णपणे बरे करून घरी पाठवले आहे. अशा हजारो यशस्वी उदाहरणांचा उल्लेख असूनही, माध्यमांतून ती माहिती कमी प्रमाणात पोहोचते. परिणामी “सरकारी म्हणजे वाईट, खाजगी म्हणजे चांगले” असा नफेखोर समज पसरवला गेला आहे.

 

आरोग्य क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक वाढवणे ही काळाची गरज असल्याचे आरोग्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात डॉ. अभय शुक्ला, डॉ. अरुण गद्रे, डॉ. अनंत फडके आणि पत्रकार दीपक जाधव यांसारखे कार्यकर्ते सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी त्यांना पाठबळ दिल्यास आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवता येतील, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *