ओपन स्पेसच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदी रद्द करा; संबंधितांवर गुन्हे दाखल करा

 

ओपन स्पेसच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदी रद्द करा; संबंधितांवर गुन्हे दाखल करा

— जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश

सोलापूर, दि. ३० डिसेंबर २०२५ :

सोलापूर जिल्ह्यात अकृषिक रेखांकनातील मंजूर खुल्या जागा (ओपन स्पेस) बेकायदेशीरपणे विकल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या असून, हा प्रकार गंभीर असल्याचे नमूद करत अशा व्यवहारांच्या नोंदी रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, तहसीलदार महसूल दिनेश पारगे, तहसीलदार बार्शी एफ. आर. शेख, सहाय्यक संचालक नगररचना विभाग, अधीक्षक भूमी अभिलेख श्री. घोडके तसेच दुय्यम उपनिबंधक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार मंजूर रेखांकनातील खुल्या जागांची खरेदी-विक्री करता येत नाही. मात्र काही विकसकांकडून अशा जागांचे बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचे तक्रारींमधून निदर्शनास आले आहे. हे प्रकार तातडीने थांबवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत दुय्यम निबंधकांना सूचना देण्यात आल्या की, खरेदी-विक्री दस्तांची नोंदणी करताना संबंधित रेखांकन तपासून ओपन स्पेसचा कोणताही व्यवहार होत नाही याची खात्री करावी. तसेच तलाठी व नगर भूमापन अधिकाऱ्यांनी नोंदी घेताना खुल्या जागेचा दस्त नसल्याची तपासणी करावी. अशा प्रकारचा दस्त नोंदणीसाठी आल्यास संबंधित तहसीलदारांनी त्वरित उपविभागीय अधिकाऱ्यास कळवावे, असेही निर्देश देण्यात आले.

तसेच सर्व तहसीलदारांनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश देण्यात आले. खुल्या जागेच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री प्रकरणांत नोंदी रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ठामपणे स्पष्ट केले.

या प्रकरणातील प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांकडे यासंदर्भात अधिक तक्रारी असल्यास त्या संबंधित तहसीलदार महसूल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *