बार्शीत बेकायदेशीर बॅनरबाजी प्रकरण; नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी
बार्शी (प्रतिनिधी): बार्शी नगरपरिषदेत कार्यरत असलेले कर्मचारी श्री. अमोल अर्जुन जाधव यांनी शासकीय सेवेत असतानाही स्वतःच्या पदोन्नतीबाबत शुभेच्छा देणारा डिजिटल बॅनर विनापरवाना लावल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच दिव्यांग खोटे प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय नोकरी प्राप्त केले बाबत देखील आरोप श्री अमोल अर्जुन जाधव यांचे वर आहेत त्या बाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी चे आदेश वरिष्ठ कार्यालयाने ,प्रधान सचिव यांनी आदेश दिले बाबत कागदपत्रे आहेत
यासंदर्भात आदर्श नगर, परांडा रोड येथील डॉ. दिपक मोहनराव पाटील यांनी बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित बॅनर हा यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराशेजारी लावण्यात आला होता. बॅनरवर नगरपालिकेच्या मिळकत विभागाकडून आवश्यक असलेला परवाना क्रमांक, दिनांक, क्यूआर कोड आदी बाबी नमूद नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच संबंधित ठिकाण हे जाहिरात व प्रसिद्धीसाठी नगरपरिषदेने मान्यताप्राप्त नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बॅनरवर “बार्शी नगर परिषद कर्मचारी वृंद” अशा नावाने शुभेच्छुकांचा उल्लेख करण्यात आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःची प्रसिद्धी केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य कर्मचारी व अधिकारी आचारसंहितेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःचे भपकेबाज प्रसिद्धीकरण टाळावे, अशी अपेक्षा असताना हा प्रकार घडल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीची प्रत नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला माहितीस्तव पाठविण्यात आल्याचे कळते. नगरपरिषद प्रशासनाकडून या प्रकरणी काय भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.