जप्त वाहन सोडण्यासाठी ५ हजारांची मागणी; म्हसवडच्या महिला पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा
सातारा एसीबीची कारवाई; भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
सातारा : अपघात प्रकरणात जप्त करण्यात आलेले वाहन सोडवून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे.
अधिकृत माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद होता. त्या प्रकरणात त्यांची मारुती सुझुकी ओम्नी कार पोलिसांनी जप्त केली होती. संबंधित वाहन परत मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात तपास अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महिला पोलीस हवालदार निता नारायण पळे यांनी ५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी ७ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. पडताळणीदरम्यान पंचांसमक्ष लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले व सातारा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे, सुनील पाटील व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, सातारा एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा हेल्पलाईन क्रमांक १०६४ वर माहिती द्यावी.