टोल प्लाझांवरील अनिवार्य सुविधांकडे दुर्लक्ष नको; वाहनधारकांच्या हक्कांबाबत NHAI नियमांची जाणीव करून देणारी अधिकृत माहिती

 

टोल प्लाझांवरील अनिवार्य सुविधांकडे दुर्लक्ष नको; वाहनधारकांच्या हक्कांबाबत NHAI नियमांची जाणीव करून देणारी अधिकृत माहिती

 

पुणे | प्रतिनिधी :

राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा चालवणाऱ्या एजन्सींनी वाहनधारकांना देणे बंधनकारक असलेल्या सुविधा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच भारतमाला व राष्ट्रीय महामार्ग नियमांनुसार अनिवार्य आहेत. मात्र अनेक ठिकाणी या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढत असून, वाहनधारकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

NHAI नियमांनुसार प्रत्येक टोल प्लाझावर मोफत व शुद्ध पिण्याचे पाणी, पुरुष, महिला व दिव्यांगांसाठी स्वच्छ शौचालये, २४x७ प्राथमिक उपचार सुविधा, सुसज्ज एम्ब्युलन्स, तसेच अपघात किंवा वाहन बिघाड झाल्यास मोफत क्रेन सेवा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. याशिवाय वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी, परावर्तित जॅकेट्स, फ्लॅशलाइट्स आणि आवश्यक सुरक्षा साधने असणे आवश्यक आहे.

 

वाहनधारकांच्या तक्रारींसाठी टोल प्लाझावर स्वतंत्र तक्रार नोंदणी केंद्र (हेल्पडेस्क) असणे, संबंधित अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक स्पष्टपणे दर्शविणे, तसेच वाहनप्रकारानुसार टोल दर, FASTag नियम, 1033 हेल्पलाइन नंबर, सीसीटीव्ही देखरेख, वेगमर्यादा व धोकादायक वळणांची माहिती फलकांवर ठळकपणे लावणे बंधनकारक आहे.

 

NHAI च्या नियमानुसार टोल बूथवर १० सेकंदांपेक्षा जास्त वाहन थांबवता येत नाही. प्रणाली बिघाड, FASTag मशीन बंद असणे किंवा वाहतूक कोंडीमुळे वाहन थांबत असल्यास संबंधित वाहनाला मोफत टोल पास देणे बंधनकारक आहे. तसेच FASTag नसल्यासही UPI/कार्डद्वारे डिजिटल पेमेंट व पावती देणे आवश्यक आहे.

 

महिला, वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वाहन थांबवण्यासाठी Lay-by Area (आपत्कालीन पार्किंग) उपलब्ध असणेही नियमात समाविष्ट आहे.

 

तक्रारीसाठी महत्त्वाची माहिती

 

टोल प्लाझावर सुविधा नसल्यास, ओव्हरचार्ज, गैरवर्तन किंवा अनावश्यक विलंब झाल्यास वाहनधारकांनी NHAI टोल-फ्री हेल्पलाइन 1033 वर तक्रार नोंदवावी. तसेच “Sukhad Yatra” NHAI मोबाइल अ‍ॅप द्वारेही तक्रार करता येते. तक्रारीसाठी टोलचे नाव, ठिकाण, वेळ, वाहन क्रमांक व फोटो/व्हिडिओ पुरावे उपयुक्त ठरतात.

 

या संदर्भात किशोर शिंदे (अध्यक्ष, श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्था, महाराष्ट्र राज्य) यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “टोल भरल्यानंतर सुविधा देणे हा टोल ऑपरेटरचा कायदेशीर कर्तव्य आहे. नियमभंग करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अन्यथा प्रवाशांची गैरसोय थांबणार नाही.”

 

टोल प्लाझांवरील नियमांची प्रभावी अंमलबजावणी व प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी NHAI कडून कडक देखरेख अपेक्षित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *