प्रकाशझोतातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमुळे बार्शी ठरणार क्रीडानगरी
नामवंत संघांच्या उपस्थितीत भव्य निमंत्रित पुरुष गट मॅट कबड्डी स्पर्धा
| बार्शी प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे संस्थापक व संवर्धक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष गट मॅट कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार असून, त्यामुळे बार्शी शहर क्रीडानगरी म्हणून ओळखले जाणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
ही स्पर्धा बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धांचे आयोजन कर्मवीर क्रीडा संकुल, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे करण्यात आले आहे.
राज्यभरातील नामवंत व बलाढ्य कबड्डी संघांचा सहभाग हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामध्ये जय भारत स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), छावा क्रीडा मंडळ (कोल्हापूर), जय मातृभूमी क्रीडा मंडळ (सांगली), शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ (परांडा–धाराशिव), श्रीराम क्रीडा मंडळ (सोलापूर), श्री श्रीकृष्ण क्रीडा मंडळ (सोलापूर) आणि राकेश भाऊ घुले कबड्डी संघ (पुणे) यांचा समावेश आहे.
स्पर्धेत विजेत्या संघास ३१ हजार रुपये, उपविजेत्या संघास २१ हजार रुपये तर तृतीय क्रमांकास ११ हजार रुपये रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची व थरारक होणार असल्याचे चित्र आहे.
राज्यस्तरीय खेळाडूंच्या उपस्थितीत होणाऱ्या या कबड्डी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी बार्शी व परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे कबड्डीचा जल्लोष अनुभवण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.