सुयश विद्यालयाच्या बेकायदेशीर इमारतींवर कारवाईची मागणी
बार्शी –
सुयश विद्यालय, कुडूवाडी रोड, बार्शी येथील तीनही इमारती बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले असून, नगर पालिका प्रशासनाने संबंधित मालमत्ता धारक शिवदास नलवडे व माधुरी गवळी यांना MRTP कायदा १९६६ नुसार दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी नोटीस बजावली होती. त्यानुसार ३० दिवसांच्या आत बांधकाम काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
यासंदर्भात नगर रचनाकार वैभव पायगुडे व तत्कालीन नगररचना कारभारी देवानंद जाधव हे केवळ ऑनलाइन प्रस्ताव दाखल झाल्याचे सांगून सात महिन्यांपासून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सांगितले की, त्यांच्या शाळेच्या इमारती जुन्या असून त्या काळी MRTP कायदा लागू नव्हता. तरीदेखील नगर पालिकेने दिलेल्या पत्राविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. “न्यायालयाचा निर्णय आम्हास मान्य राहील,” असे ते म्हणाले.
शिवदास नलवडे यांच्यावर जमीन बळकावण्याचे, मानसिक त्रास देण्याचे आणि विविध प्राधिकरणांकडे खटाटोप करण्याचे आरोप देखील करण्यात आले. तसेच सुयश विद्यालयाने शिक्षण विभाग, नगर विकास विभाग, अग्निशमन विभाग, भविष्य निर्वाह निधी कार्यालय आणि आरटीओ विभागाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुख्य मागणी : सुयश विद्यालय व संबंधित मालमत्ता धारकांवर नियमभंगाच्या प्रकरणी तातडीने कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.